गुन्हेदेश-विदेशराजकीय

राजकीय नेत्याच्या सुनेंची संशयास्पद आत्महत्या; हुंडाबळीचा आरोप, कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा

राजकीय नेत्याच्या सुनेंची संशयास्पद आत्महत्या; हुंडाबळीचा आरोप, कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुन वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ मे रोजी समोर आली आहे. या प्रकरणात आता नव्या खुलास्यांमुळे खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या मृत्यूला केवळ आत्महत्या मानणे कठीण जात असून तिच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर जखमा आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.

शवविच्छेदन अहवालानुसार, गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे नमूद असून, हात, पाय, मांडी, हनुवटीवर जखमा आणि रक्तस्रावाचे डाग आढळले आहेत. त्यामुळे ही आत्महत्या नसून छळामुळे झालेला मृत्यू असण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. अंतर्गत अवयवांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.

हुंड्याच्या मागणीसाठी छळाचा आरोप

वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, विवाहावेळी ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींकडून जमीन खरेदीसाठी २ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. याशिवाय, पती शशांक हगवणे याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत सतत मानसिक त्रास दिला. मार्च २०२५ मध्ये सासू आणि नणंदने मारहाण करत तोंडावर थुंकले, असेही तक्रारीत नमूद आहे.

तीन आरोपी अटकेत, दोन फरार

पोलिसांनी शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना अटक केली असून, २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील फरार असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. राजकीय पदावर असले तरी कोणत्याही आरोपीला अभय दिले जाणार नाही, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिपने वाढवली संशयाची धार

या प्रकरणात वैष्णवीची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये ती मैत्रिणीला म्हणताना ऐकू येते, “सासू बदनामी करते, सासरे व दीर हात उचलतात, मी घटस्फोट घेणार आहे.” या क्लिपची सत्यता तपासली जात असून, ती प्रकरणातील पुरावा ठरू शकते.

हा प्रकार समोर येताच पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या या प्रकरणात पोलीस तपास अधिक गतीने सुरू असून, लवकरच फरार आरोपींच्या अटकेची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button