
जळगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ‘विजयाचा शंखनाद
महायुतीच्या रथयात्रेने शहर झाले भगवामय
जळगाव: जळगाव शहर महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आज महायुतीने आपले पूर्ण बळ झोकून देत अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी शहरातून भव्य ‘महाविजय रथयात्रा’ काढण्यात आली. या रथयात्रेने जळगाव शहराचा मुख्य भाग भगवामय करून टाकला असून, महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचाराला या निमित्ताने मोठी गती मिळाली आहे. निवडणुकीच्या या महासंग्रामात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीने संपूर्ण शहरात राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.
रथयात्रेची सुरुवात शहराचे आराध्य दैवत आणि स्फूर्तीस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी सजवलेल्या रथावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते स्वार झाले होते. शिवाजी पुतळ्यापासून निघालेली ही रथयात्रा शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून फिरली. संपूर्ण मार्गावर नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती, तर अनेक ठिकाणी रथावर पुष्पवृष्टी करून मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या रॅलीने महायुतीमधील एकजूट आणि विजयाचा निर्धार अधोरेखित केला.
या रथयात्रेत महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते एकदिलाने सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे सर्व ७५ उमेदवार आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. नेत्यांच्या या मांदियाळीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला पाहायला मिळाला.
रथयात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे महायुतीचे ७५ उमेदवार जे एकाच वेळी प्रचारात उतरले होते. ‘अबकी बार, महायुती सरकार’ आणि ‘विकासाच्या नावावर, महायुतीलाच कौल’ अशा घोषणांनी जळगाव शहर दणाणून गेले होते. विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वीच महायुतीचे काही उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या वृत्तामुळे महायुतीच्या गोटात विजयाचा आत्मविश्वास अधिकच दृढ झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याने जळगावच्या राजकीय मैदानात महायुतीचे पारडे जड झाल्याचे चित्र आज स्पष्टपणे दिसून आले.





