
जळगाव जिल्हा पोलिसांकडून तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया; कोट्यवधींच्या अमली पदार्थांचा साठा नष्ट होणार
जळगाव : अमली पदार्थांविरोधातील कारवाईला अधिक प्रभावी बनविण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या तब्बल ९५८.०७० किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला हा मुद्देमाल न्यायालयीन आदेशानुसार नष्ट करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण, जळगाव तालुका, एरंडोल, जामनेर आणि मुक्ताईनगर पोलीस ठाण्यांमध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमधून हा गांजा जप्त करण्यात आला होता. यामध्ये चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांमध्ये ४३२.२४० किलो, जळगाव तालुका पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात ५८ किलो, एरंडोल पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात १८२ किलो, जामनेर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात २२ किलो आणि मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांमध्ये २६२.४३० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
यापैकी काही गुन्ह्यांमध्ये न्यायालयाचे अंतिम निकाल लागले असून काही प्रकरणे अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार जप्त अमली पदार्थांचा सुरक्षितरीत्या नाश करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
जिल्हा पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर भूमिका घेतली असून भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून युवकांना वाचविण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.





