खान्देशजळगांवशासकीयसामाजिक

जळगाव जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर २१ जणांना नियुक्ती

जळगाव जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर २१ जणांना नियुक्ती

गुढीपाडव्यापूर्वी मिळणार ‘नोकरीचे गिफ्ट’; २३ निलंबित कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना

जळगाव : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या २१ उमेदवारांना शुक्रवारी (दि.१३) नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. त्याआधी आज या उमेदवारांचे समुपदेशन करण्यात येणार असून गुढीपाडव्यापूर्वीच त्यांना नोकरीचे ‘गिफ्ट’ मिळणार आहे. यासोबतच विविध कारणांमुळे निलंबित असलेल्या २६ कर्मचाऱ्यांपैकी २३ जणांना पुनर्स्थापित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
अनुकंपा भरतीसाठी २१६ उमेदवार प्रतीक्षेत
जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी सध्या २१६ उमेदवार प्रतीक्षेत आहेत. यापैकी १८ उमेदवारांनी गट ‘ड’ श्रेणीत नियुक्ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली असून त्यासाठीची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पूर्ण करण्यात आली आहे.

तीन उमेदवारांना शिक्षक पदावर संधी
अनुकंपा यादीतील तीन उमेदवार टीईटी उत्तीर्ण असल्याने त्यांना समुपदेशनाच्या माध्यमातून शिक्षक पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी ९५ कर्मचाऱ्यांची अनुकंपा तत्त्वावर भरती केली होती. आता त्यात आणखी २१ जणांची भर पडणार आहे.

गट ‘ड’ मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा
जिल्हा परिषदेत गट ‘ड’ मध्ये २०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. मात्र अनुकंपा तत्त्वावरील अनेक उमेदवार गट ‘ड’ पद स्वीकारण्यास इच्छुक नसल्याने प्रशासनाकडून इच्छुक उमेदवारांनाच नियुक्ती दिली जाणार आहे. उर्वरित उमेदवारांना गट ‘क’ पदे रिक्त होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

निलंबित कर्मचाऱ्यांना दिलासा
दरम्यान, जिल्हा परिषदेची निलंबन आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत दिव्यांग दाखले तसेच इतर कारणांमुळे निलंबित झालेल्या २३ कर्मचाऱ्यांना पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र ज्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्या पुनर्स्थापनेचा निर्णय सध्या स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button