खान्देशजळगांव

महापालिकेच्या स्थायी समितीत मोबाईल टॉवर थकबाकीचा मुद्दा गाजला

महापालिकेच्या स्थायी समितीत मोबाईल टॉवर थकबाकीचा मुद्दा गाजला

२८ कोटींची थकबाकी वसुलीसाठी कठोर कारवाईची मागणी

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज पार पडली असून, शहरातील मोबाईल टॉवर कंपन्यांकडील तब्बल २८ कोटी रुपयांच्या थकबाकीचा मुद्दा सभेत चांगलाच गाजला. स्थायी समिती सदस्य नितीन लढ्ढा यांनी प्रशासनाला धारेवर धरत, थकीत रकमेच्या वसुलीसाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी केली.
मोबाईल टॉवर कंपन्यांकडून सन २०२६-२७ पूर्वीची आकारणी अद्याप थकीत असून, या कंपन्या महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असतानाही महसुलापासून पालिकेला वंचित ठेवत आहेत. यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे लढ्ढा यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर शासनाशी पत्रव्यवहार करून कठोर कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी केली.

भुयारी गटार जोडणीत नागरिकांची उदासीनता

शहरातील भुयारी गटार योजनेबाबतही बैठकीत चर्चा झाली. काही प्रभागांत सुमारे २९ लाख रुपयांच्या नवीन गटार बांधकामाचा प्रस्ताव आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कार्यान्वित झालेल्या भुयारी गटार योजनेला नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले.

सध्या शहरात केवळ २० टक्के घरांनी गटार जोडणी केली असून, तब्बल ८० टक्के जोडणी अद्याप बाकी आहे. नागरिकांची उदासीनता आणि प्रशासनाची संथ गती यामुळे हे काम रखडले असल्याची टीका नितीन लढ्ढा यांनी केली.

सभापतींच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. शहरातील प्रलंबित प्रश्नांवर लवकरच ठोस निर्णय घेण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button