
विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; १२ मे रोजी मतदान
९ जागांसाठी रंगणार चुरस; प्रमुख नेत्यांचा कार्यकाळ संपणार
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडत असून विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ९ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या १२ मे २०२६ रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होऊन राज्याला ९ नवे आमदार मिळणार आहेत.
१३ मे २०२६ रोजी या ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आणि राजेश राठोड यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे विशेष लक्ष लागले आहे.
सध्याच्या विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता भाजपला ५ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे, तर शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि महाविकास आघाडी १ जागा जिंकू शकते, असा अंदाज आहे. मात्र, राष्ट्रवादीकडे असलेली अतिरिक्त मते आणि महायुतीकडून अधिक उमेदवार दिल्यास ही निवडणूक बिनविरोध न होता चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठीही या निवडणुकीत मतदान होणार आहे.
निवडणूक वेळापत्रक:
२३ एप्रिल २०२६ रोजी अधिसूचना जाहीर होणार असून ३० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २ मे रोजी छाननी, तर ४ मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. १२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल आणि सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे.




