
नाशिक कुंभमेळ्याच्या कथित बनावट वर्क ऑर्डरवरून जळगावात आंदोलन
साबण, सॅनिटायझर अन् भिंग घेऊन शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध; निष्पक्ष चौकशीची मागणी
जळगाव : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाशी संबंधित कथित बनावट वर्क ऑर्डरच्या प्रकरणावरून जळगावातील राजकीय वातावरण तापले आहे. या कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी हातात साबण, सॅनिटायझर आणि भिंग घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले.
‘भ्रष्टाचार स्वच्छ करा’चा संदेश
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी कथित बनावट वर्क ऑर्डर तयार करून प्रशासकीय आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ हातात साबण आणि सॅनिटायझर घेऊन ‘भ्रष्टाचार स्वच्छ करा’ असा संदेश देण्यात आला. तर भिंगाच्या माध्यमातून कुंभमेळ्याच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली.
निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशीची मागणी
या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. प्रकरणाची तातडीने दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी अथवा निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली निष्पक्ष चौकशी समिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली.
चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनाम्याची मागणी
चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. कथित बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.
निधी आणि वर्क ऑर्डरमध्ये पारदर्शकता हवी
सिंहस्थ कुंभमेळा हे मोठे धार्मिक आणि सार्वजनिक आयोजन असल्याने त्याच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, असे आंदोलकांनी म्हटले. कुंभमेळ्याच्या नियोजनातील प्रत्येक काम, त्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी आणि संबंधित वर्क ऑर्डर याबाबत संपूर्ण पारदर्शकता ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती
या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, तालुकाप्रमुख प्रमोदभाऊ घुगे, मनसे जिल्हाध्यक्ष मुकुंद रोटे, शिवसेना महिला महानगरप्रमुख मनिषाताई पाटील, विनायक धर्माधिकारी, डॉ. रमाकांत कदम, प्रमोद सोनवणे, प्रभाकर कोळी, अशोक पाटील, प्रेमराज राठोड, किरण ठाकूर, महेश अहिरे, स्वप्निल राजपूत, किशोर धनगर, योगेश पाटील यांच्यासह मनसेचे सुनील सोनवणे, सागर जाधव, शैलेश चौधरी, तेजस कोळी, श्रीराम पाटील, चेतन पाटील, संकेत जाधव, गोपाल भारुडे, भरत पाटील, प्रशांत बाविस्कर, गणेश कुंभार, हेमंत कोळी, कुणाल पाटील, किरण सपकाळे, अनिल राठोड, बापू मेने, लखन पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





