
बहिणाबाई मार्टची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी
महिला बचत गटांच्या उत्पादनांचे कौतुक; ब्रँडिंग व विपणनावर भर देण्याच्या सूचना
जळगाव : प्रतिनिधी (दि. १५ एप्रिल २०२६)
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शहरातील कोंबडी बाजार परिसरात उभारण्यात आलेल्या ‘बहिणाबाई मार्ट’ला भेट देत तेथील कामकाजाची सविस्तर पाहणी केली. महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या या मार्टमधील विविध उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.
जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या उपक्रमात महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री केली जात आहे. नायर यांनी मार्टमधील विविध स्टॉल्सना भेट देऊन उत्पादनांची गुणवत्ता तपासली तसेच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले.
यावेळी त्यांनी उत्पादनांच्या पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि विपणनावर अधिक भर देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. महिला बचत गटांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही केले.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अशा उपक्रमांना अधिक चालना देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या पाहणी दौऱ्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, हरीश भोई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




