खान्देशजळगांवराजकीयसामाजिक

उष्माघाताला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करा; मृतांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत द्या

उष्माघाताला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करा; मृतांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत द्या

आ. एकनाथराव खडसेंची सरकारकडे मागणी; वाढत्या तापमानामुळे परिस्थिती गंभीर

जळगाव | प्रतिनिधी राज्यात उष्णतेची तीव्र लाट पसरली असून वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने मृत्यू होण्याच्या घटनांत चिंताजनक वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी उष्माघाताला तात्काळ ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्र्यांना पत्र पाठवून तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात, विशेषतः जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे अनेक ठिकाणी नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू होत असल्याचेही समोर येत आहे. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधताना खडसे यांनी पत्रात नमूद केले की, यापूर्वीही त्यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न व औचित्याच्या मुद्द्यांद्वारे सरकारचे वारंवार लक्ष वेधले होते.
सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे की, सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी १२ ते ४ या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना जारी केल्या आहेत. शासनाने या संकटाचे गांभीर्य मान्य केले असतानाही केवळ तांत्रिक कारणांमुळे उष्माघाताचा समावेश नैसर्गिक आपत्तीत नसल्याने मृतांच्या कुटुंबांना मदतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने तात्काळ पावले उचलून उष्माघाताचा ‘नैसर्गिक आपत्ती’मध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच केंद्राचा अंतिम निर्णय होईपर्यंत राज्य सरकारने आपल्या विशेष निधीतून किंवा आपत्ती व्यवस्थापन निधीतून उष्माघाताने मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना किमान १० लाख रुपयांची आर्थिक मदत तत्काळ देण्याची आग्रही विनंतीही त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button