
चाळीसगाव रेल्वे फ्लायओव्हरला २६३ कोटींची मंजुरी; वाहतूक होणार सुरळीत
रेल-ओव्हर-रेल प्रकल्पामुळे गाड्यांचा विलंब कमी; क्षमतेत मोठी वाढ अपेक्षित
भुसावळ | प्रतिनिधी मध्य रेल्वेअंतर्गत चाळीसगाव येथील महत्त्वाच्या रेल-ओव्हर-रेल (आरओआर) फ्लायओव्हर प्रकल्पाला सुमारे २६३.८६ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामुळे चाळीसगाव-धुळे रेल्वेमार्ग हा मनमाड-भुसावळ मुख्य मार्गावरून फ्लायओव्हरद्वारे वरून नेण्यात येणार असून, रेल्वे वाहतूक अधिक सुलभ व गतिमान होणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
सुमारे ११.०१ किलोमीटर लांबीच्या या फ्लायओव्हरमध्ये मुख्य पूलासह दोन स्थानक इमारती, एक मोठा पूल, १६ लहान पूल, एक अंडरब्रिज आणि पाच मर्यादित उंचीचे सबवे उभारण्यात येणार आहेत. या माध्यमातून विविध रेल्वेमार्गांवरील गाड्यांची हालचाल स्वतंत्रपणे होऊन तांत्रिक अडथळे दूर होणार आहेत.
वाहतुकीवरील ताण कमी होणार
सध्या चाळीसगाव परिसरात तीन रेल्वे क्रॉसिंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. धुळ्याकडून येणाऱ्या गाड्यांना मुख्य मार्ग ओलांडावा लागत असल्याने विलंब होतो. प्रस्तावित चौथ्या मार्गामुळे ही समस्या अधिक वाढण्याची शक्यता होती. मात्र, नव्या फ्लायओव्हरमुळे ही अडचण दूर होऊन गाड्यांची वाहतूक सुरळीत होणार आहे.
क्षमतेत वाढ आणि वेळेची बचत
सध्या या मार्गाची वहन क्षमता ४५.४ टक्के असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर २०२९-३० पर्यंत ती १०७.९६ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नव्या रचनेमुळे अप दिशेला सुमारे १५ मिनिटे तर डाउन दिशेला २० मिनिटांची वेळ वाचणार आहे.
तांत्रिक बाबी
या प्रकल्पाचे सर्वेक्षण कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) यांनी केले असून, मार्ग १:२०० ग्रेडिएंटनुसार डिझाइन करण्यात आला आहे. यामुळे गाड्या ताशी १३० किलोमीटर वेगाने धावू शकतील.





