खान्देशगुन्हेजळगांव

पाचोऱ्यात मोबाईल अपडेटच्या नावाखाली सायबर डल्ला; बँक खात्यातून रक्कम लंपास

पाचोऱ्यात मोबाईल अपडेटच्या नावाखाली सायबर डल्ला; बँक खात्यातून रक्कम लंपास
​पाचोरा | प्रतिनिधी मोबाईल सॉफ्टवेअर अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी एका तरुणाच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तक्रारदाराने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.

​पाचोरा येथील शिवाजी नगर भागात राहणारे समीर शेख गुलाब यांनी या संदर्भात लेखी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर अपडेटसाठी एक लिंक (अॅप्लिकेशन) आले होते. मोबाईल अपडेट होईल या हेतूने समीर यांनी त्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर त्यांचा मोबाईल अचानक बंद झाला आणि सुमारे ४० मिनिटांनंतर आपोआप सुरू झाला.

​समीर यांचे एअरटेल पेमेंट बँकेत खाते असून, त्यात९६ हजार ६५३ रुपये शिल्लक होते. मात्र, दुसऱ्या दिवशी २१ एप्रिल रोजी त्यांनी व्यवहार करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या खात्यात चक्क ९६ हजार ६५३ रुपये ‘मायनस’ (उणे) शिल्लक असल्याचे दिसून आले. अवघ्या काही वेळातच त्यांचे बँक खाते हॅक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सध्या त्यांचे मोबाईल हँडसेटही हॅक झालेल्या स्थितीत असून त्यावरून केवळ कॉलिंग होत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

​मोबाईल अपडेटची लिंक पाठवून बँक खाते रिकामे करण्यासोबतच ओव्हरड्राफ्ट किंवा इतर माध्यमातून खाते मायनसमध्ये नेल्याने तक्रारदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या सायबर क्राईमचा तपास करून आपली रक्कम परत मिळावी, अशी मागणी समीर शेख यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे केली आहे.

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहनही या निमित्ताने केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button