खान्देशजळगांव

‘स्मार्ट’ योजनेतून मिळणार २५ वर्षे मोफत वीज

अल्प उत्पन्न गटातील घरांवर बसणार सौर ऊर्जा संच; अत्यल्प खर्चात मिळणार लाभ

‘स्मार्ट’ योजनेतून मिळणार २५ वर्षे मोफत वीज

अल्प उत्पन्न गटातील घरांवर बसणार सौर ऊर्जा संच; अत्यल्प खर्चात मिळणार लाभ

जळगाव : राज्य शासनाच्या “स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट)” योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर अत्यल्प खर्चात एक किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती संच बसविण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानामुळे लाभार्थींना अत्यंत कमी हिस्सा भरून सौर प्रकल्प बसवता येणार असून सुमारे २५ वर्षे मोफत वीज मिळण्याचा लाभ या योजनेतून मिळणार आहे. पात्र ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने “स्मार्ट” योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील १.५४ लाख आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ३.४५ लाख अशा एकूण ५ लाख घरगुती ग्राहकांना लाभ दिला जाणार आहे. महिन्याला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध करून देणे आणि अतिरिक्त वीज विक्रीतून उत्पन्न मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर योजना राबविण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरू केलेल्या “प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना” अंतर्गत एक किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ३० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. “स्मार्ट” योजनेत याच अनुदानासोबत राज्य शासनाकडूनही अतिरिक्त आर्थिक मदत मिळणार असल्याने ग्राहकांवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

या योजनेत दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना केंद्र सरकारकडून ३० हजार रुपये आणि राज्य सरकारकडून १७ हजार ५०० रुपये असे एकूण ४७ हजार ५०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ग्राहकांना केंद्र सरकारच्या ३० हजार रुपयांच्या अनुदानाशिवाय राज्य शासनाकडून स्वतंत्र मदत दिली जाणार आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील ग्राहकांना १० हजार रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थींना १५ हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे.

सौर ऊर्जेमुळे विजेच्या वाढत्या खर्चातून दिलासा मिळणार असून पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे पात्र ग्राहकांनी तातडीने अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button