
जळगावच्या स्वच्छतेला ‘हायटेक’ टच; मनपाच्या ताफ्यात रोड स्वीपिंग मशीन दाखल
धूळमुक्त रस्त्यांसाठी स्मार्ट सफाई यंत्रणा कार्यान्वित; सहापैकी दोन मशीन शहरात दाखल
जळगाव : शहरातील रस्त्यांवरील धूळ, कचरा आणि पारंपरिक झाडू सफाईमुळे उडणाऱ्या धुळीपासून नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत महानगरपालिकेला मंजूर झालेल्या अत्याधुनिक मेकॅनिकल रोड स्वीपिंग मशीनपैकी दोन मशीन शुक्रवारी मनपाच्या ताफ्यात दाखल झाल्या. उर्वरित चार मशीनही लवकरच शहरात दाखल होणार असून त्यामुळे शहराच्या स्वच्छतेत मोठी भर पडणार आहे.
सध्या शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि गर्दीच्या भागांमध्ये पारंपरिक झाडूच्या सहाय्याने सफाई केली जाते. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ हवेत उडत असल्याने नागरिक, दुकानदार आणि वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. वाढत्या धुळीमुळे श्वसनाचे आजार आणि आरोग्याच्या इतर तक्रारी वाढत असल्याची बाबही वारंवार समोर येत होती. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्मार्ट सफाई यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मनपाच्या ताफ्यात दाखल झालेल्या नव्या रोड स्वीपिंग मशीनमुळे रस्त्यांवरील धूळ आणि कचरा थेट मशीनमध्ये जमा होणार असून सफाईदरम्यान धूळ उडणार नाही. त्यामुळे शहरातील प्रमुख मार्ग अधिक स्वच्छ, नीटनेटके आणि धूळमुक्त ठेवण्यास मदत होणार आहे. ही यंत्रणा जलद, प्रभावी आणि पर्यावरणपूरक असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून महानगरपालिकेला एकूण सहा मशीन मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी दोन मशीन शहरात दाखल झाल्या असून उर्वरित चार मशीन लवकरच उपलब्ध होणार आहेत. मनपाच्या या आधुनिक उपक्रमामुळे जळगावच्या स्वच्छता व्यवस्थेला ‘स्मार्ट’ स्वरूप प्राप्त होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





