
जळगाव नवीन बस स्थानकावर वृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास
प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याची हातसफाई; जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील गजबजलेल्या नवीन बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चोपडा तालुक्यातील वडी येथील वृद्ध शेतमजुराच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमण कौतीक पाटील (वय ७०, रा. वडी ता. चोपडा) हे आपल्या पत्नी यमुनाबाई रमण पाटील यांच्यासह २२ मे २०२६ रोजी दुपारी जळगाव शहरात आले होते. दुपारी सुमारे २.१० वाजण्याच्या सुमारास ते नवीन बस स्थानक परिसरात असताना तेथे मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने यमुनाबाई पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अत्यंत शिताफीने चोरून नेली.
चोरीस गेलेल्या दागिन्यात सोन्याचे मणी व मंगळसूत्राचे पदक असून, सदर दागिना सुमारे ९ ग्रॅम वजनाचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. अंदाजे १० ते १२ वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आलेल्या या दागिन्याची किंमत सुमारे ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटना लक्षात येताच बस स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर पीडित वृद्ध दाम्पत्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. रमण कौतीक पाटील यांच्या फिर्यादीवरून २३ मे २०२६ रोजी दुपारी १.२४ वाजता भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम ३०३(२) अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शरीफ शेख करीत आहेत





