अपघातात चौघांच्या मृत्यूप्रकरणी स्कॉर्पिओ चालक अटकेत

अपघातात चौघांच्या मृत्यूप्रकरणी स्कॉर्पिओ चालक अटकेत
वरणगाव, ता. भुसावळ वरणगावजवळील हिरा मारोती मंदिर परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी स्कॉर्पिओ चालकाला वरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ (एमएच १९ ईव्ही ५३५३) चालक सुधीर सुभाष पाटील (रा. उदळी, ता. रावेर) यांच्याविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून त्याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या या अपघातात दुचाकी (एमएच २२ बीडी ३६८१) वरील विजय शंकर काळे, त्यांच्यासोबत असलेल्या ऐश्वर्या बहादूर भोसले, विघ्नेश शंकर चव्हाण आणि मोनालिसा बहादूर भोसले यांचा मृत्यू झाला. आजारी असलेल्या मोनालिसाला
उपचारासाठी वरणगाव येथे घेऊन जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली.
मृत चौघांवर शुक्रवारी मध्यरात्री कपिल वस्ती नगर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी ईश्वर तायडे, साहेबराव कोळी आणि फिरोज पठाण करीत आहेत.





