इतर

जळगाव महापालिकेला नवे आयुक्त; आदित्य जिवने यांची नियुक्ती

जळगाव महापालिकेला नवे आयुक्त; आदित्य जिवने यांची नियुक्ती

जळगाव,: जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी २०२१ बॅचचे आयएएस अधिकारी आदित्य जिवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने मंगळवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) चार अधिकाऱ्यांच्या बदल्या व नव्या नियुक्त्यांचे आदेश जारी केले.

गेल्या काही दिवसांपासून आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या बदलीच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर राज्य शासनाच्या आदेशानंतर या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक (जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर) म्हणून कार्यरत असलेले आदित्य जिवाने यांची जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ढेरे यांच्या नव्या नियुक्तीबाबत अद्याप स्पष्टता नाही

दरम्यान, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली निश्चित झाली असली तरी त्यांची पुढील नियुक्ती कुठे करण्यात आली आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यासंदर्भात संपर्क साधला असता ज्ञानेश्वर ढेरे यांनी बदलीच्या वृत्ताला दुजोरा दिला, मात्र प्रशासनाला अद्याप अधिकृत आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगितले.

राज्यातील अन्य तीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

राज्य शासनाच्या आदेशानुसार डॉ. माधवी खोडे-चवरे (आयएएस, २००७ बॅच), अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग यांची मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सुनील महिंद्रकर (आयएएस, एससीएस-२०१५) यांची मुंबई येथे अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.अनिता मेश्राम (आयएएस, एससीएस-२०१५), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) आयुक्त, नागपूर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

विकासकामांना मिळणार गती

आदित्य जिवाने हे २०२१ बॅचचे तरुण आयएएस अधिकारी असून महावितरणमधील प्रशासकीय अनुभवाच्या बळावर ते जळगाव शहरातील विकासकामांना नवी गती देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक, स्वच्छता आणि नागरी विकासाशी संबंधित विविध प्रकल्पांवर त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक वेगाने काम होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button