
पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम फोडण्याचा डाव उधळला
गॅस कटरने एटीएम कापण्याचा प्रयत्न; ८.८९ लाखांची रोकड सुरक्षित
जळगाव : पाचोरा पोलिसांच्या तत्पर आणि धाडसी कारवाईमुळे एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास करण्याचा चोरट्यांचा डाव अयशस्वी ठरला. जारगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएममध्ये गॅस कटरच्या सहाय्याने चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, वेळेत पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने एटीएममधील तब्बल ८ लाख ८९ हजार ७०० रुपयांची रोकड सुरक्षित राहिली.
माहितीनुसार, बुधवारी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान पाचोरा शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील जारगाव येथील सारोळा रोडवरील एसबीआयच्या एटीएमला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पोलिसांना याची माहिती मिळाली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी हरीश अहिरे व पोशी बंजारा यांना तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच तीन संशयित तरुण एटीएममधील रोकड असलेले कॅबिनेट काळ्या रंगाच्या एमएच-४०-सीएस-७०२८ क्रमांकाच्या कारमध्ये ठेवण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले.
पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी कारसह तारखेडा मार्गे धूम ठोकली. त्यानंतर पाचोरा पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू करत धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपर्यंत धाव घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध टोल नाके, धुळे पोलीस तसेच मध्य प्रदेशातील नियंत्रण कक्षांना वाहनाची माहिती देण्यात आली असून शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, संबंधित एटीएममध्ये ८ लाख ८९ हजार ७०० रुपयांची रोकड असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे मोठे आर्थिक नुकसान टळले असून चोरट्यांचा डाव पूर्णपणे उधळून लावण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.





