8 व्या रोलर स्केटिंग स्पोर्ट्स स्पर्धेत जळगावच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी
पोलीस स्केटिंग क्लबच्या माही भंगाळे, विराज साळवे आणि लिखित महाजन यांना पदकांची कमाई
जळगाव, (प्रतिनिधी) – सोलापूर येथे आयोजित 8 व्या रोलर स्केटिंग स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित रोलर स्केटिंग स्पोर्ट्स स्पर्धेत जळगावच्या पोलीस स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
दि. २१ जून रोजी सोलापूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे ३०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत पोलीस स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पदके पटकावली.
माही भंगाळे हिने ३०० मीटर रेस आणि ५०० मीटर रेसमध्ये सुवर्णपदक जिंकून दुहेरी सुवर्ण यश मिळविले.
विराज साळवे याने ३०० मीटर रेसमध्ये सुवर्णपदक तर ५०० मीटर रेसमध्ये रौप्यपदक पटकावले.
लिखित महाजन याने ३०० मीटर आणि ५०० मीटर या दोन्ही स्पर्धांमध्ये रौप्यपदके मिळवत उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.
या यशस्वी खेळाडूंचे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर तसेच वेल्फेअर पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंच्या या यशामागे स्केटिंग प्रशिक्षक जागृती काळे-महाजन, कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम-जंजाळे तसेच सहप्रशिक्षक स्वप्नील निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
जळगावच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा गौरव वाढला असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.