
राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जळगाव पोलीस दलाच्या खेळाडूंची दमदार कामगिरी
स्केटिंग व तायक्वांदोमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई; जिल्ह्याचा लौकिक उंचावला
जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जुलै २०२६ मध्ये विविध ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्केटिंग तसेच तायक्वांदो स्पर्धांमध्ये जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्केटिंग क्लब व तायक्वांदो खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या ४७ व्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत जळगाव पोलीस स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची लयलूट केली. विराज मनोज सावळे याने १०० मीटर आणि रिले स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविले. रसिका नंदकिशोर पवार, राजवीर नंदकिशोर पवार, देविक विनोद साळुंखे आणि लावण्या निलेश भोळे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. तर आरोही दर्शन गोसावी, मिष्टी निलेश भोळे आणि तन्मय धिरज सोनवणे यांनी रौप्य व कांस्यपदके जिंकून संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
यानंतर सोलापूर येथे झालेल्या आठव्या राष्ट्रीय रोलर स्पोर्ट्स स्केटिंग स्पर्धेत विराज मनोज सावळे याने ३०० मीटर आणि ५०० मीटर प्रकारात दुहेरी सुवर्णपदक पटकावले. माही स्वप्नील भंगाळे हिने ३०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळविले, तर लिखीत महेश महाजन याने ३०० मीटर आणि ५०० मीटर स्पर्धेत प्रत्येकी रौप्यपदकाची कमाई केली.
अहिल्यानगर येथे झालेल्या तिसऱ्या महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वांदो स्पर्धेतही जळगाव पोलीस दलाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. आराध्य आकाश परदेशी याने सुवर्णपदक जिंकले, तर दक्षिका शिरसाट, गौरिकासिंग जाधव आणि याशिका चौधरी यांनी रौप्यपदके मिळविली. गौरांगी जंजाळे आणि लावण्या राकेश पाटील यांनी कांस्यपदक पटकावून संघाच्या यशात भर घातली.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर, वेलफेअर विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे तसेच वेलफेअर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूंना कराटे प्रशिक्षक अश्विनी निकम आणि स्केटिंग प्रशिक्षक जागृती काळे यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या प्रशिक्षणामुळे जळगाव पोलीस दलाची क्रीडा क्षेत्रातील यशस्वी परंपरा अधिक बळकट होत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
“राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये जळगाव पोलीस दलाच्या खेळाडूंनी मिळविलेल्या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.”





