गारवडी धरण परिसरातील दीड लाखांच्या चोरीचा अवघ्या दोन दिवसांत छडा; तिघांना अटक, पोलीस कोठडी

गारवडी धरण परिसरातील दीड लाखांच्या चोरीचा अवघ्या दोन दिवसांत छडा; तिघांना अटक, पोलीस कोठडी
सावदा | प्रतिनिधी l मुख्तार शेख l रावेर तालुक्यातील गारवडी धरण परिसरात पर्यटकाच्या इको कारमधून दीड लाख रुपये रोख रक्कम, पाकीट व इतर साहित्य चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना सावदा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून चोरीस गेलेल्या रोख रकमेचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील खडका चौफुली परिसरातील रहिवासी तथा टुरिस्ट चालक शेख समीर शेख दगडू (वय २५) हे १९ जुलै रोजी दुपारी मित्र-मैत्रिणींसह इको कार (क्र. MH-02-CH-8499) घेऊन गारवडी धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. वाहनाचा हप्ता भरण्यासाठी जमा केलेली १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम, पाकीट तसेच इतर साहित्य त्यांनी गाडीतील बॅगेत ठेवले होते. कारचे दरवाजे बंद असले तरी डिक्कीला लॉक नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी डिक्की उघडून रोख रक्कम, पाकीट व इतर साहित्य असलेली बॅग तसेच महिलांच्या पर्स चोरी करून नेल्या.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सावदा पोलीस ठाण्यात २० जुलै रोजी भारतीय न्याय संहिता (BNS-2023) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान फिर्यादीने संशय व्यक्त केलेल्या तिघांचा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शोध घेतला. गारवडी धरण परिसरात संशयित आढळून आल्यानंतर फिर्यादीने त्यांची ओळख पटवली. पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेतली असता आरोपी शरीफ वजीर नहवी (वय २५, रा. चिचाटी, ता. रावेर) याच्याकडून फिर्यादीचे चोरीस गेलेले पाकीट, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, आरसी बुक व अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी राजू रज्जाक तडवी (वय ३१, रा. खिरोदा, ता. रावेर), शरीफ वजीर नहवी (रा. चिचाटी, ता. रावेर) आणि अकिल उस्मान तडवी (वय ३१, रा. लोहारा, ता. रावेर) या तिघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.
२१ जुलै रोजी आरोपींना रावेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत आरोपींच्या सांगण्यावरून एक रिकामी बॅग व एक लेडीज पर्स जप्त करण्यात आली असून चोरीस गेलेल्या रोख रकमेची विल्हेवाट कुठे लावली, याचा सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने केली.





