
‘एक झाड आईच्या नावाने’ उपक्रमांतर्गत उस्मानिया पार्क परिसरात वृक्षांचे वाटप
कादरिया फाउंडेशन व मित्र परिवाराचा उपक्रम
जळगाव: कादरिया फाउंडेशन, मित्र परिवार, उस्मानिया पार्क आणि माझर पठाण फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरामध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘एक झाड आईच्या नावाने’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत परिसरातील नागरिकांना वृक्षवाटप करण्यात आले.

पर्यावरण संतुलित राखण्यासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमास उस्मानिया पार्क परिसरातील सर्व प्रमुख जबाबदार नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी कादरिया फाउंडेशनचे फारुक कादरी, माझर पठाण, हुझेफ कादरी, युवा अध्यक्ष शफी शेख, के. जी. एन. पार्कचे तौसिफ काकर, आशिक मणियार, फिरोज पिंजारी यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येकाने आपल्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ किंवा तिच्या आदरांजलीसाठी किमान एक तरी झाड लावून त्याचे जतन करावे, असा संदेश या वेळी उपस्थितांनी दिला. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी विशेष जनजागृती निर्माण झाली असून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.





