
पॉकेटमारी करणारे तीन अट्टल चोर जेरबंद, रोख रक्कम जप्त
जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी
जळगाव: जळगाव शहरातील गजबजलेल्या भागात प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या खिशातील ऐवज लांबवणाऱ्या तीन अट्टल चोरांना जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने (DB Team) कौशल्यपूर्ण तपास करत गजाआड केले आहे. संशयितांकडून चोरीस गेलेली संपूर्ण रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चोपडा येथील रहिवासी व सध्या मासुमवाडी जळगाव येथे राहणारे जावेद खान रसूल खान (वय ४०, व्यवसाय- गवंडीकाम) हे ३० जुलै २०२६ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रकाश मेडिकल चौक ते महात्मा फुले मार्केट दरम्यानच्या टीपटॉप वेअर दुकानासमोरून जात होते. त्यावेळी अज्ञात चोरांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २२७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यात वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांनी दिलेल्या सूचनांनुसार जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी गुन्हे शोध पथकाची स्थापना केली होती. या पथकाने परिसरातील गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासण्यासोबतच गुप्त बातमीदार आणि ‘नेत्रम’ कक्षातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पाहणी केली.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी अर्शद शेख रज्जाक उर्फ चिकू शाहरुख (वय ३२), फारुक शेख हनीफ (वय २८) आणि शाकीर शेख शकील उर्फ घाऱ्या राजू (वय ३०, तिघे रा. गेंदालाल मिल, जळगाव) हे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्यासमक्ष खाक्या दाखवून चौकशी केली असता, तिघांनीही पॉकेटमारी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेली १० हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करून त्यांना अटक केली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार सुनील पाटील, दीपक शिरसाट, पोलीस हवालदार उमेश भांडारकर, सतीश पाटील, वीरेंद्र शिंदे, योगेश पाटील, नंदलाल पाटील, पोलीस अंमलदार अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार तसेच ‘नेत्रम’ शाखेचे मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास आणि सीडीआर विभागाचे गौरव पाटील व मिलिंद जाधव यांच्या पथकाने केली आहे.





