खान्देशजळगांवराजकीयशासकीयसामाजिक

मुसळधार पावसामुळे पारोळा तालुक्यातील बाधित भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी

मुसळधार पावसामुळे पारोळा तालुक्यातील बाधित भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी

स्वतंत्र पंचनामे व पुलाचे काम तातडीने करण्याचे निर्देश

जळगाव,: पारोळा तालुक्यात ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या देवगाव, तामसवाडी व मुंदाणे प्र या गावांना पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज भेट देत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी घर पडझड, शेती पिकांचे नुकसान तसेच पाणी शिरून बाधित झालेल्या घरांचे स्वतंत्र पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

पाहणी दौऱ्याची सुरुवात देवगाव येथील बोरी नदी परिसरातून झाली. नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठील शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याची प्रत्यक्ष पाहणी पालकमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी केली. बोरी नदीच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे नागरिकांनी यावेळी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

पाहणीदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना घरपडझड, शेती पिकांचे नुकसान आणि पाणी शिरून झालेल्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे तयार करून ते निर्धारित मुदतीत सादर करण्याचे आदेश दिले. बाधितांना मदत देण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

दौऱ्यात मंदाणे येथील खचलेल्या पुलाचीही पाहणी करण्यात आली. या पुलाचे काम विशेष योजनेतून पूर्ण करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री श्री महाजन यांनी दिले.

यावेळी आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते, तहसीलदार उल्हास देवरे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री बाविस्कर ,पी. आय.दीपक पाटील तसेच कृषी विभाग, पंचायत समिती आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button