
आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
साहेबांसह टेबलवरील कर्मचाऱ्याच्या नावाने लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगाव : दिव्यांग तक्रारदाराच्या कारचे कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी आरटीओ कार्यालयातील अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांच्या नावाने लाचेची मागणी करणाऱ्या खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. योगेश रामभाऊ पाटील (वय ३९, रा. आदर्शनगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या एजंटचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारच्या पासिंगसाठी मागितली लाच
तक्रारदार दिव्यांग असून त्यांनी १ जुलै रोजी खान्देश मोटर्सच्या शोरूममधून कार खरेदी केली होती. ३ ऑगस्ट रोजी शोरूममधील खासगी एजंट योगेश पाटील याच्यामार्फत कारचे आरटीओ कार्यालयात तात्पुरते रजिस्ट्रेशन करण्यात आले.
कारमध्ये दिव्यांगांसाठी आवश्यक हॅंडकिट बसविल्यानंतर तक्रारदार १२ ऑगस्ट रोजी कारचे कायमस्वरूपी पासिंग करून घेण्यासाठी आरटीओ कार्यालयात गेले होते. त्यावेळी योगेश पाटील याने आरटीओ कार्यालयातील ‘साहेब’ तसेच संबंधित टेबलवरील कर्मचाऱ्यांच्या नावाने काम करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तडजोडीनंतर साडेआठ हजार रुपये ठरले
तक्रारदार आणि एजंट यांच्यात तडजोड झाल्यानंतर लाचेची रक्कम साडेआठ हजार रुपये ठरली. त्यानंतर तक्रारदाराने १७ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एजंट योगेश पाटील याने सात हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, योगेश पाटील याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाने लाचेची मागणी करण्यात आल्याने या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.





