इलेक्ट्रिक दुकानातील घरफोडीचा गुन्हा उघड; तिघे अटकेत


इलेक्ट्रिक दुकानातील घरफोडीचा गुन्हा उघड; तिघे अटकेत
४० किलो तांब्याची तार व गुन्ह्यात वापरलेली दुचाकीसह ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव, प्रतिनिधी : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोर बाजार परिसरातील ‘मातोश्री’ इलेक्ट्रिक दुकानाचे शटर वाकवून व कुलूप तोडून चोरी करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ४० किलो तांब्याची तार व गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शटर वाकवून दुकानात चोरी
३ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० ते ४ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेदरम्यान ढोर बाजारातील ‘मातोश्री’ इलेक्ट्रिक दुकानाचे शटर वाकवून तसेच कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील ४० किलो तांब्याची नवीन तार, मोटार चटई लूमसाठी व रिपेअरिंगसाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७२१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक तपासातून आरोपी जेरबंद
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना आरोपींचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलिक धनके यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले. तसेच तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तिघांना ताब्यात घेण्यात आले.
तिघांची नावे
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये
हर्षल गोपाल परदेशी (२२), रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव;
कमलेश सुरेश पवार (२१), रा. सुमेरसिंग हॉटेलजवळ, कुसुंबा;
रितेश निवृत्ती साळुंखे (२१), रा. दत्तमंदिराजवळ, कुसुंबा
यांचा समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपींनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ६० हजार रुपये किमतीची ४० किलो नवीन व जुनी तांब्याची तार तसेच ३० हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली. एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुंडलिक धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील यांच्यासह पोलीस हवालदार रमेश चौधरी, प्रमोद लाडवंजारी, रामकृष्ण पाटील, किरण चौधरी, गिरीश दिलीप पाटील, मोतीलाल बोरसे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी तसेच पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, राहुल घेटे, किरण पाटील, गणेश ठाकरे, ललित नारखेडे, पोलीस अंमलदार शशिकांत मराठे व रमाकांत साळुंखे यांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली.



