

जैन हिल्सवर पारंपरिक पोळ्याचा जल्लोष; वृषभराजाची सवाद्य मिरवणूक ठरली आकर्षण
आदिवासी होळी नृत्य, मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके अन् अनुभूतीच्या विद्यार्थ्यांची लेझीम; सालदारगडींचा सपत्नीक सन्मान
जळगाव | प्रतिनिधी
कृषीसंस्कृतीशी नाते सांगणारा पारंपरिक पोळा सण जैन हिल्सवर उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. आदिवासी बांधवांचे पारंपरिक होळी नृत्य, मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके, सालदार मंडळींचे पावरी नृत्य, अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांची लेझीमवरील गणेशवंदना आणि सजविलेल्या वृषभराजांची भव्य सवाद्य मिरवणूक यामुळे जैन हिल्सचा परिसर पारंपरिक रंगात न्हाऊन निघाला.

कृषी संशोधन व विकास कार्यक्रमांतर्गत जैन हिल्सच्या कृषी विभागातर्फे पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय माहेश्वरी, महापौर दीपमाला काळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, प्रकुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदोर मावोजो, राजेंद्र मयूर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
जैन परिवाराच्या हस्ते वृषभराजाचे पूजन
पोळा उत्सवानिमित्त अशोक जैन, ज्योती जैन, निशा जैन, शोभना जैन आणि डॉ. भावना जैन यांच्यासह जैन परिवाराच्या हस्ते वृषभराजाचे पूजन करण्यात आले. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा करण्याची सुरू केलेली परंपरा आजही जपली जात आहे.
आधुनिकतेचा स्वीकार करताना नव्या पिढीचे भारतीय कृषीपरंपरा आणि संस्कृतीशी नाते दृढ राहावे, त्यांना या परंपरांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि कृषीसंस्कृतीतील बैलांचे महत्त्व समजावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
ध्यानमंदिर परिसरातील कृषी संशोधन प्रात्यक्षिक केंद्राच्या विविध ठिकाणच्या सालदार मंडळींनी आपल्या बैलांना आकर्षक पद्धतीने सजविले होते. रंगीबेरंगी सजावट, झूल आणि पारंपरिक अलंकारांनी सजलेले वृषभराज लक्षवेधी ठरले. त्यानंतर ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
श्रद्धा ज्योत येथे अभिवादन
वृषभराजांची मिरवणूक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या स्मृतिस्थळ ‘श्रद्धा ज्योत’ येथे थांबवून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मारुती मंदिराचे दर्शन घेत मिरवणूक सरस्वती पॉईंट, गुरुकुल पार्किंग मार्गे हेलीपॅड मैदानावर पोहोचली.
हेलीपॅड मैदानावर प्रा. डॉ. विजय माहेश्वरी, अशोक जैन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते धवल ध्वज फडकावून बैल पोळा उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
आदिवासी नृत्याने वेधले लक्ष
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळच्या जंगल परिसरातून आलेल्या ३५ आदिवासी बांधवांच्या समूहाने सादर केलेल्या पारंपरिक होळी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषेतील उत्स्फूर्त नृत्यातून आदिवासी लोकसंस्कृतीचे मनोहारी दर्शन घडले.
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्यातून मंगलमय वातावरण निर्माण केले. विद्यार्थ्यांच्या देखण्या कलाविष्काराला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. त्यानंतर एकलव्य ग्रुपच्या ५ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या मल्लखांबाच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना रोमांचित केले. धाडस, चपळता, कौशल्य आणि आत्मविश्वासाचा सुरेख मिलाफ या प्रात्यक्षिकांत पाहायला मिळाला.
चिंटू गोंड, वाल्मिक शिंदे, सुरेश पावरा यांना मान
पोळा फोडणाऱ्या सालदारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी रोख पारितोषिक देण्याची परंपरा आहे. यावर्षी एकूण २० हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. भाऊंची सृष्टी येथील सालदार चिंटू नवलसिंग गोंड यांनी प्रथम मान मिळविला. गोशाळेचे सालदार वाल्मिक शिंदे यांनी द्वितीय, तर जैन सोसायटीचे सालदार सुरेश गरेसिंग पावरा यांनी तृतीय मान मिळविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
सालदारगडींचा सपत्नीक गौरव
जैन इरिगेशनच्या कृषी विभागाचे काम विविध ठिकाणी सुरू असते. वर्षभर शेतात मेहनत घेणाऱ्या सालदारगडींचा सन्मान करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. जैन इरिगेशनमधील सालदारगडींचा भेटवस्तू देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, मनपा आयुक्त आदित्य जीवने, उपवनसंरक्षक सौरेश सहाय, यामिनी शहा, डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के., संजय सोन्नजे, अजय काळे, कल्याणी मोहरील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गोविंद बारेला, बाबा मडावी, किशोर शिंदे, वाल्मिक शिंदे, हंसराज जाधव, रणजीत पवार, भगवान सावळे, सुरत ब्राम्हणे, रामसिंग पवार, गजानन पवार, धनसिंग राठोड, अनार पवार, चिंटू गोंड, विजय कासार, मन्नु पावरा, मनसाराम पावरा, सोनसिंग राठोड, जगदीश सिसोदिया, दिलीप पवार, सुरेश पावरा, मधुकर केदार, विकास पाटील, रतन साळुंखे, शिवदास राठोड, चेतन वाघमोडे, रामेश्वर सावळे, सागर मोरे, विजय सपकाळे, गणपत शेळके, विशाल राठोड आणि अंकुश पाटील यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
कृषीपरंपरा, लोककला, आदिवासी संस्कृती आणि आधुनिक शिक्षणाचा सुरेख संगम घडविणारा जैन हिल्सवरील पोळा उत्सव उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर कुळकर्णी यांनी केले.




