खान्देशगुन्हेजळगांव

खूनप्रकरणातील चार फरार आरोपी जळगावात जेरबंद

खूनप्रकरणातील चार फरार आरोपी जळगावात जेरबंद

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शनिपेठ पोलिसांची कारवाई; मोबाईल विक्रीसाठी जळगावात आल्याची माहिती

जळगाव, प्रतिनिधी : हिमाचल प्रदेशातील खूनप्रकरणात फरार असलेल्या चार आरोपींना शनिपेठ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जळगाव शहरातून ताब्यात घेतले. हिमाचल प्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शनिपेठ पोलिसांनी ही कारवाई केली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींबाबतची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांना देण्यात आली आहे.

दारूच्या नशेत झालेल्या वादातून खून

हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश कुमार यांच्या खूनप्रकरणी ३० सप्टेंबर २०२६ रोजी एफआयआर क्रमांक ८२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत आणि आरोपी एकत्र दारू पीत असताना झालेल्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. खून केल्यानंतर मृतदेह तलावात फेकल्याची माहिती तपासात समोर आल्याचे हिमाचल प्रदेश पोलिसांकडून सांगण्यात आले.

अंबालामार्गे मुंबईकडे प्रवास

घटनेनंतर चारही आरोपी किसनपूर येथून अंबाला येथे गेल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर त्यांनी ११०५८ अमृतसर-मुंबई एक्स्प्रेसने मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान पैसे संपल्याने तसेच भूक लागल्याने ते जळगाव रेल्वे स्थानकावर उतरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जळगावमध्ये मोबाईल विक्री करण्यासाठी ते आले असल्याचीही माहिती समोर आली.

चार आरोपींची नावे

हिमाचल प्रदेश पोलिसांकडून शोध सुरू असलेल्या आरोपींमध्ये चंदन कुमार (रा. कुतुबपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार), रोशन गोगल मुखिया (रा. कुतुबपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार), संतोष कुमार (रा. बरियारपूर, जि. मुझफ्फरपूर, बिहार) आणि अजित कुमार जोगा मेहतो (रा. पंडरक, जि. पाटणा, बिहार) यांचा समावेश आहे.

लोकेशन मिळताच पोलिसांची शोधमोहीम

चारही आरोपींचे लोकेशन शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी शनिपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डॉ. विशाल जयस्वाल यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून गुन्हे शोध पथकाला तातडीने आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार परि. पोउनि संतोष खेडकर, पोहेकॉ विजय खैरे, पोहेकॉ योगेश जाधव, पोहेकॉ अनिल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घुगे, नवजीत चौधरी, अमोल वंजारी, पराग दुसाने आणि रवींद्र साबळे यांच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कारवाई

तांत्रिक माहिती आणि मिळालेल्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शोध घेत चारही आरोपींना शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणपुरे आणि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हिमाचल पोलिसांशी समन्वय

ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींबाबतची माहिती हिमाचल प्रदेशातील संबंधित पोलिस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी हिमाचल प्रदेश पोलिसांशी समन्वय साधला जात असल्याचे शनिपेठ पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button