
इकरा शाहीन उर्दू स्कूलमध्ये गांधी जयंतीनिमित्त सत्य आणि अहिंसेचा संदेश
विद्यार्थ्यांनी साकारले महात्मा गांधींचे विचार; स्वच्छता, मानवता आणि राष्ट्रसेवेचा दिला संदेश
जळगाव, प्रतिनिधी : इकरा शाहीन उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांचे सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि राष्ट्रसेवेचे विचार विविध उपक्रमांतून मांडत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिला.
या प्रसंगी इयत्ता ५ वी ‘अ’चा विद्यार्थी साद मुश्ताकीम पिंजारी याने महात्मा गांधींची भूमिका प्रभावीपणे साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गांधीजींच्या वेशभूषेत साद याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वासह विचारांचेही प्रभावीपणे सादरीकरण केले.
सकाळच्या सत्रात नूरजहाँ मिस यांनी महात्मा गांधी यांची साधी राहणी, मानवता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी परस्पर प्रेम, बंधुभाव आणि सहिष्णुतेची भावना जोपासावी, असा संदेश त्यांनी दिला.
दुपारच्या सत्रात इफ्तेखार सर यांनी महात्मा गांधी यांच्या तत्त्वांबरोबरच त्याग आणि बलिदानावर प्रकाश टाकला. सत्य, अहिंसा आणि देशसेवेच्या तत्त्वांसाठी गांधीजींनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच गांधीजींचे आदर्श आपल्या जीवनात अंगीकारून देश व समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या समजून घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक रियाज शाह सर व सुपरवायझर जाकीर सर यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व सहकाऱ्यांचे आभार मानले. तसेच गांधी जयंतीच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि मानवतेच्या आदर्शांचा आपल्या जीवनात अवलंब करावा, असे आवाहन केले.
इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार व सचिव एजाज अहमद मलिक यांनीही गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. नव्या पिढीपर्यंत महात्मा गांधींचे आदर्श आणि राष्ट्रसेवेचा संदेश पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.




