खान्देशगुन्हेजळगांवराजकीयशासकीयशिक्षणसामाजिक

चेतन वाणी : माध्यम क्षेत्राचा बुलंद आवाज

१६ वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रवासात शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टिंगपासून सोशल मीडिया, ब्रॅण्डिंग आणि सामाजिक कार्यापर्यंत प्रभावी ठसा

चेतन वाणी : माध्यम क्षेत्राचा बुलंद आवाज

१६ वर्षांच्या पत्रकारितेच्या प्रवासात शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टिंगपासून सोशल मीडिया, ब्रॅण्डिंग आणि सामाजिक कार्यापर्यंत प्रभावी ठसा

जकी अहमद l खानदेश टाइम्स न्यूज

पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याची प्रक्रिया नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. या विचाराला आपल्या लेखणीची ताकद जोडत गेल्या १६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले चेतन वाणी यांनी जळगावच्या माध्यम क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. निर्भीड लेखणी, शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टिंग आणि सामाजिक विषयांवरील प्रभावी मांडणी यामुळे त्यांचा पत्रकारितेतील प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

परिसर वार्ताहर म्हणून पत्रकारितेची सुरुवात करणाऱ्या चेतन वाणी यांना लिखाणाची आवड सुरुवातीपासूनच होती. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रात घडणाऱ्या घटनांकडे बारकाईने पाहण्याची आणि त्यातून समाजासमोर वास्तव मांडण्याची त्यांची वृत्ती होती. पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या लेखणीद्वारे समाजातील प्रश्न जनतेपर्यंत पोहोचविता येतात, ही जाणीव त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला दिशा देणारी ठरली.

पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात विविध नामांकित दैनिकांमध्ये काम करण्यासाठी संघर्ष करत त्यांनी दैनिक देशोन्नतीमध्ये उपसंपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली. याच काळात त्यांच्या प्रभावी लेखणीची दखल घेतली जाऊ लागली. अल्पावधीतच जळगाव शहरासह जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यानंतर तरुण भारत, स्वतंत्र भारत, दैनिक लोकशाही यांसह विविध दैनिकांमध्ये त्यांनी उपसंपादक, शहर प्रमुख या पदांवर यशस्वीरित्या  काम केले.

चेतन वाणी यांचा पत्रकारितेतील अनुभव केवळ वृत्तपत्रांपुरता मर्यादित राहिला नाही. डिजिटल माध्यमाचे महत्त्व ओळखून त्यांनी जळगाव लाईव्ह न्यूज पोर्टल तसेच महापोलीस न्यूज पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल पत्रकारितेतही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग या आधुनिक माध्यम क्षेत्रातील विविध पैलूंमध्येही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे.

विशेषतः शोध पत्रकारिता आणि क्राईम रिपोर्टिंगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव ही त्यांच्या पत्रकारितेची महत्त्वाची जमेची बाजू आहे. गुन्हेगारी क्षेत्रातील घटनांचा अभ्यास, घटनांमागील वास्तव शोधण्याची वृत्ती आणि बातमीची प्रभावी मांडणी यामुळे क्राईम रिपोर्टिंगमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी शैली निर्माण केली. यासोबतच राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती आणि उद्योग क्षेत्रातील विशेष लेखनाचाही त्यांना मोठा अनुभव आहे.

विविध दैनिकांबरोबरच मंत्रालय तसेच माहिती व जनसंपर्क विभागाशी संबंधित पत्रकारितेचा अनुभव त्यांच्या कार्यक्षेत्राची व्यापकता अधोरेखित करतो. लोकसभा, जिल्हा परिषद ,विधानसभा आणि नगरपालिका ,महानगरपालिका निवडणुकीच्या काळात मीडिया मॅनेजमेंट, तसेच सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग अशा विविध क्षेत्रांमध्येही त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे.

पत्रकारिता करत असतानाच सामाजिक कार्याची आवडही त्यांनी जपली. पोलीस अधिकारी व कर्मचारी, पत्रकार आणि विविध शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना एका व्यासपीठावर आणत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. भंडारा, महाप्रसाद आणि इतर सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रचिती आली.

पत्रकारितेच्या धावपळीतही सहकाऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, अडचणीच्या काळात मदतीसाठी धावून जाणे आणि पत्रकार बांधवांना सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती यामुळे ‘अर्ध्या रात्रीही पत्रकार बांधवांसाठी धावून जाणारा पत्रकार’ अशी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सध्या चेतन वाणी यांच्याकडे गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी ते समर्थपणे सांभाळत आहे.

१६ वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारिता प्रवासात अनेक चढ-उतार पाहत, बदलत्या माध्यमविश्वासोबत स्वतःला सतत अपडेट ठेवत चेतन वाणी यांनी पत्रकारिता, डिजिटल मीडिया आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांत आपले योगदान दिले आहे. त्यांच्या लेखणीची धार, सामाजिक बांधिलकी आणि सहकाऱ्यांप्रती असलेली आपुलकी यामुळे त्यांचा हा प्रवास निश्चितच उल्लेखनीय ठरतो.

आज 5 ऑक्टोबर 2026 हा  चेतन वाणी यांचा वाढदिवस. या विशेष दिनानिमित्त त्यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आगामी काळातही त्यांच्या लेखणीतून समाजातील प्रश्नांना सातत्याने वाचा मिळो, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अधिक व्यापक होवो आणि त्यांच्या हातून समाजोपयोगी उपक्रमांची अशीच अखंड मालिका घडत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.

चेतन वाणी यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यश आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button