
फैजपुरमध्ये ‘आपला दवाखाना’ झोपडपट्टी भागात स्थलांतराच्या मागणीवर शिवसेना आक्रमक; १२ ऑक्टोबरला महामोर्चाचा इशारा
फैजपूर : शासनाच्या सन २०२५-२६ च्या परिपत्रकानुसार ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना झोपडपट्टी व गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आहे. मात्र, फैजपूर नगरपालिकेने हे दवाखाने गरजू वस्त्यांऐवजी कॉलनी परिसरात सुरू केल्याचा आरोप करत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
याबाबत शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रांत अधिकारी, फैजपूर यांना निवेदन देऊन दोन्ही दवाखाने मूळ झोपडपट्टी परिसरात स्थलांतरित करण्याची मागणी केली.
शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, धनाजी नाना नगर, अण्णाभाऊ साठे नगर, कोळीवाडा व १२ बलुतेदार वस्ती या भागासाठी असलेला दवाखाना जनशक्ती कॉलनी येथे सुरू आहे. तसेच इस्लामपुरा परिसरासाठी असलेला दवाखाना तहानगर कॉलनी परिसरात सुरू करण्यात आला आहे. हे दोन्ही दवाखाने तात्काळ संबंधित झोपडपट्टी भागात स्थलांतरित करावेत, अशी मागणी करण्यात आली.

१२ ऑक्टोबरला महामोर्चाचा इशारा
निवेदनाची दखल घेऊन दवाखाने मूळ झोपडपट्टी परिसरात स्थलांतरित न केल्यास १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता झोपडपट्टी परिसरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामार्गे प्रांत कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
दवाखाने स्थलांतरित होईपर्यंत प्रांत कार्यालयासमोर आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर यांच्या लेटरहेड स्वाक्षरी च्या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना माजी नगरसेवक मनोज भाऊ कापडे, शिवसेना शहर प्रमुख पिंटू भाऊ मंडवाले, सोशल मीडिया तालुका प्रमुख भारत चौधरी, कुणाल (पप्पू) भाऊ चौधरी, भूषण चौधरी, सनी तेजकर, धर्मा भिल, अजय भिल, विशाल वाघुळदे, अजय मोरे, चंदन वाघुळदे, रवींद्र कापडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.




