खान्देशगुन्हेजळगांव

चोरीची मोटार विक्रीला काढताच चौघे पोलिसांच्या जाळ्यात!

रमजीपूरच्या शेतातून लांबवलेली ५ एच.पी.ची विद्युत मोटार हस्तगत; आणखी चोऱ्यांचा तपास सुरू

चोरीची मोटार विक्रीला काढताच चौघे पोलिसांच्या जाळ्यात!

रमजीपूरच्या शेतातून लांबवलेली ५ एच.पी.ची विद्युत मोटार हस्तगत; आणखी चोऱ्यांचा तपास सुरू

रावेर, प्रतिनिधी : तालुक्यातील रमजीपूर येथील शेतातून चोरलेली ५ एच.पी. क्षमतेची समूराई कंपनीची पाण्याची विद्युत मोटार विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना रावेर पोलिसांनी अटक केली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई करत चोरीचा मोटार पंप हस्तगत केला आहे.

६ ऑक्टोबर २०२६ रोजी रमजीपूर येथील शेतकरी मोहन लालचंद कावडकर यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या शेतातून ३ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी ५ एच.पी. क्षमतेची पाण्याची विद्युत मोटार चोरून नेली होती. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक व बीट अंमलदारांचे विशेष पथक तपासासाठी सक्रिय करण्यात आले.

सापळा रचून चौघांना पकडले

तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला रमजीपूर गावातील काही संशयित इसम चोरीची मोटार विक्रीसाठी आणणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राजेंद्र सुधाकर महाजन (३०), उमेश प्रकाश धनगर (२३), रितेश जगन्नाथ कावडकर (२३) आणि आनंदा गोपाळ धनगर (२८, सर्व रा. रमजीपूर, ता. रावेर) यांना ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर लपवून ठेवलेला चोरीचा मोटार पंप पोलिसांनी हस्तगत केला. चौघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे.

आणखी चोऱ्यांचा तपास

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारे आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का, तसेच या गुन्ह्यात अन्य साथीदारांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. बीट अंमलदार सिकंदर तडवी पुढील तपास करीत आहेत.

संशयास्पद खरेदी-विक्रीची माहिती द्या

शहरासह ग्रामीण भागात जुनी विद्युत मोटार, कॉपर वायर अथवा विद्युत पंपाची संशयास्पद खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमूल बच्छाव, पोलीस हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी आणि विकार शेख यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button