
लग्नानंतर जेवणातून विष देऊन कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न?
पारोळा तालुक्यात खळबळ; दोन महिलांना धुळे जिल्ह्यातून ताब्यात घेतले, कथित एजंटचा पोलिसांकडून शोध सुरू

पारोळा, प्रतिनिधी : लग्नाच्या माध्यमातून घडवून आणलेल्या कथित व्यवहारानंतर जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन एकाच कुटुंबातील तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन महिलांना पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील निंमगूळ गावाजवळून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलांना आणून देणाऱ्या कथित एजंटचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
लग्नानंतर दोन दिवसांतच प्रकार
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, वेल्हाणे येथील वाल्मिक ताराचंद पाटील (वय ३२) याचा विवाह ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सुमन सुभाष सहाणी हिच्याशी झाला होता. या विवाहासाठी झारखंड किंवा छत्तीसगड येथून आदिवासी समाजातील दोन महिलांना कथित एजंटमार्फत आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी अडीच लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या व्यवहारासह विवाहाशी संबंधित सर्व बाबींची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.
९ ऑक्टोबर रोजी जेवणातून विषारी पदार्थ दिल्याचा आरोप
९ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरी जेवणातून उंदीर मारण्याचे औषध देऊन फिर्यादी, त्यांचे वडील ताराचंद शांताराम पाटील आणि आई सरलाबाई यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित महिला पैसे घेऊन निघून गेल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेत ताराचंद पाटील आणि सरलाबाई यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिस पाटलांच्या माहितीवरून शोधमोहीम
वेल्हाणे येथील पोलिस पाटलांनी घटनेची माहिती पारोळा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने पथक रवाना केले. बिट अंमलदार पोलीस हवालदार सुनील हाटकर, पोलीस शिपाई गवळी आणि पोलीस शिपाई शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. संबंधित महिला धुळे जिल्ह्याच्या दिशेने गेल्याचे समजताच पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील निंमगूळ गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. सुमन सुभाष सहाणी आणि आरती सूर्यप्रकाश पटेल अशी त्यांची नावे आहेत.
पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी गणेश ताराचंद पाटील (वय ३४, व्यवसाय शेती, रा. वेल्हाणे, ता. पारोळा) यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १२३, ३१६(२) आणि ३(५) प्रमाणे १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.५८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात महिलांना आणून देणाऱ्या कथित एजंटची भूमिका काय होती, आर्थिक व्यवहार कसा झाला आणि गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींवरील आरोप आणि घटनेमागील नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.




