
रावेर पोलिसांचा धडाका! गुरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन आरोपी जेरबंद
शेतकऱ्याच्या गोठ्यातून ४० हजारांची गाय लंपास; गुन्हे शोध पथकाची कारवाई

रावेर, प्रतिनिधी : शेतकऱ्याच्या गोठ्यातून सुमारे ४० हजार रुपये किमतीची गाय चोरून नेणाऱ्या तीन संशयित आरोपींना रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पुढील तपास सुरू आहे.
गोठ्यातून गाय चोरीला
रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथील शेतकरी संतोष देविदास पाटील (वय ४२) हे शेतीसोबत दुग्धव्यवसाय करतात. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १.३० वाजेच्या सुमारास घराशेजारील गोठ्यात गुरांचा आवाज आल्याने ते पाहण्यासाठी गेले. त्यावेळी गोठ्यात बांधलेली एक गाय गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गोठ्यात दोन गायी आणि तीन म्हशी बांधलेल्या होत्या. त्यापैकी सुमारे ४० हजार रुपये किमतीची गाय चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे आरोपी ताब्यात
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पथकाने घटनास्थळासह परिसरातील माहिती संकलित करून गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान संशयितांची ओळख पटवून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1) शेख मुस्ताक शेख इसाक (वय ३६), रा. कुरेशी मोहल्ला, रसूलपूर, हल्ली मुक्काम मदिना कॉलनी, रावेर.
2) शेख अक्रम शेख असलम (वय २५), रा. जुनी नगरपालिका समोर, इमामवाडा, रावेर.
3) शेख समीर शेख कलीम (वय २६), रा. मदिना कॉलनी, रावेर.
पोलिसांच्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या संशयितांनी गाय चोरी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण, विकारुद्दीन शेख आणि योगेश पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.




