
जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना!
विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे औद्योगिक प्रोत्साहने लागू; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात स्थापन होणाऱ्या पात्र नवीन, विस्तारीकरण व विविधीकरण उद्योग घटकांना विदर्भ-मराठवाडा क्षेत्राप्रमाणे औद्योगिक प्रोत्साहने देण्यास मान्यता दिली आहे. उद्योग, गुंतवणूक, सेवा व खनिकर्म विभागाने दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला आहे.
जळगाव जिल्ह्याचा औद्योगिकदृष्ट्या अधिक विकसित भागांशी असलेला असमतोल दूर करून जिल्ह्यातील उद्योगांना अधिक प्रोत्साहने मिळावीत, यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. याच अनुषंगाने उद्योगमंत्र्यांना पत्र देऊन संपूर्ण जळगाव जिल्ह्याला घोषित करण्यात आलेल्या ‘डी प्लस’ दर्जाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने या पाठपुराव्याला यश आले आहे.
शासन निर्णयानुसार, जळगाव जिल्ह्यातील पात्र सूक्ष्म, लघु, मध्यम, मोठे, विशेष मोठे, विशाल व अतिविशाल नवीन, विस्तारीकरण तसेच विविधीकरण उद्योग घटकांना नवीन सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत विदर्भ, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव व धुळे या वर्गीकृत क्षेत्राप्रमाणे औद्योगिक प्रोत्साहनांचे लाभ अनुज्ञेय राहणार आहेत. यासाठी संबंधित उद्योगांनी गुंतवणूक व रोजगारनिर्मितीचे निर्धारित निकष पूर्ण करणे आवश्यक असून, लाभ नवीन सामूहिक प्रोत्साहन योजनेतील अटी व शर्तींच्या अधीन राहतील.
या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यात नवीन उद्योगांची स्थापना, विद्यमान उद्योगांचा विस्तार, औद्योगिक गुंतवणुकीत वाढ आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. विशेषतः जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींना आणि नवउद्योजकांना याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
जळगाव जिल्ह्याला केवळ औद्योगिक दर्जाची घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष प्रोत्साहनांचा लाभ मिळावा, ही भूमिका घेऊन केलेल्या पाठपुराव्याला आज शासन निर्णयाच्या माध्यमातून मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी व्यक्त केला.
यावेळी जळगावच्या औद्योगिक विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, मा. उद्योगमंत्री श्री. उदयजी सामंत, मा. मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन, मा. मंत्री श्री. संजयजी सावकारे तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.




