खान्देशगुन्हेजळगांव

गुजरातहून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नववधूसह तिघे ठार

गुजरातहून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नववधूसह तिघे ठार

वराड फाट्याजवळ भीषण अपघात :सहा जण गंभीर जखमी

जळगाव | प्रतिनिधी – आनंदाच्या क्षणी दुर्दैवाने घाला घालत धरणगाव तालुक्यातील वराड फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

चाक निखळल्याने भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, वऱ्हाड वापी (गुजरात) येथून अकोल्याकडे निघाले होते. वराड फाटा परिसरात पोहोचताच चालत्या क्रुझर वाहनाचे पुढील चाक अचानक निखळले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून वाहन समोरून येणाऱ्या ट्रकवर जोरात आदळले. धडक इतकी भीषण होती की क्रुझर वाहन रस्त्यावर पलटी झाले.

मृत व जखमींची माहिती
या अपघातात पूजा रवी वाघळकर (२५), दत्तू तुळशीराम भागवत (४२) आणि जगदीश चंदूभान वाघळकर (५२) यांचा जागीच मृत्यू झाला.
तर प्रेम भारत वाघडकर (२४), नितेश सुरेश कटोले (३५), अमोल दामोदर गीते (३५), रवी प्रभाकर वाघोळकर (३२), तुळशीराम भीमराव भागवत (६७) यांच्यासह एकूण सहा जण जखमी झाले आहेत. यामध्ये अंश नितेश कडोले (१४) याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

जखमींवर तातडीने उपचार
अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची नोंद धरणगाव पोलीस ठाणे येथे करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी
घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले होते. उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. इमरान पठाण तसेच गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे समन्वयक शिवाजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

“लग्नाचा आनंद काही क्षणातच दु:खात बदलला. या भीषण अपघाताने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button