खान्देशगुन्हेजळगांव

जळगावात विजेच्या धक्क्याने मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू

जळगावात विजेच्या धक्क्याने मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू

तुटून पडलेली विद्युत तार बाजूला करताना दुर्घटना; मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आईचाही मृत्यू

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरातील आसोदा रोडवरील प्रवीण मोहन टॉकीज परिसरात तुटून पडलेली विद्युत तार बाजूला करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आईचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. राहुल सपकाळे (वय ३५) आणि सुनंदा सपकाळे अशी मृत मायलेकांची नावे आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आसोदा रोडवरील मोहन टॉकीज परिसरात सपकाळे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या घराजवळ विद्युत तार तुटून खाली पडली होती. ही तार बाजूला करण्यासाठी राहुल सपकाळे यांनी प्रयत्न केला असता, त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला. ते विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याचे पाहून त्यांची आई सुनंदा सपकाळे यांनी मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, मुलाला बाजूला करण्याच्या प्रयत्नात त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला.

या दुर्घटनेत मायलेक गंभीररीत्या भाजून बेशुद्ध पडले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी दोघांनाही तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले.

घरालगतच विद्युत तार तुटून पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. एकाच वेळी कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने सपकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालयात नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button