
मॅसॉनिक लॉजच्या मिळकतींचे व्यवहार रोखण्याचे तहसीलदारांचे आदेश
सह दुय्यम निबंधकांना नियमानुसार कारवाईचे निर्देश; केदारनाथ सानप यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची दखल

भुसावळ, प्रतिनिधी : येथील मॅसॉनिक लॉजसह इतर संबंधित मिळकतींचे खरेदी-विक्री व्यवहार होऊ नयेत, यासाठी त्या मिळकती प्रतिबंधित करण्याचे आदेश भुसावळच्या तहसीलदारांनी सह दुय्यम निबंधकांना दिले आहेत. या प्रकरणात नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मॅसॉनिक लॉज तसेच इतर संबंधित मिळकतींच्या कथित कागदपत्रांच्या आधारे होणाऱ्या अनधिकृत व बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहारांबाबत सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहावे, अशी तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली होती.
या तक्रारीची दखल घेत सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी चौकशी केली होती. त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित मिळकतींचे अभिलेख तपासून शर्तभंग झाला असल्यास पुढील कार्यवाही करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत वादग्रस्त मिळकत आणि मॅसॉनिक लॉजच्या इतर मिळकतींचे व्यवहार होऊ नयेत, यासाठी त्या प्रतिबंधित करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र, या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने केदारनाथ सानप यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर भुसावळ तहसीलदारांनी या प्रकरणाची दखल घेत सह दुय्यम निबंधकांना संबंधित मिळकतींचे व्यवहार रोखण्यासाठी आणि नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.




