
जळगाव शहरातून ९ दुचाकी चोरी करणारा मध्य प्रदेशातील चोरटा अटकेत
२ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त; शहर व जिल्हापेठ पोलिसांतील ९ गुन्हे उघड

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा आणि जळगाव शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्य प्रदेशातील एका संशयित दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. गोकुळ साहेबराव पाटील (वय ४५, रा. बोरसर, ता. जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे २ लाख ३२ हजार रुपये किमतीच्या ९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, जळगाव शहर पोलीस ठाण्यातील ८ आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ९ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
बळीराम पेठेतून दुचाकी लंपास
३० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ ते २.२० वाजेदरम्यान बळीराम पेठेतील गोपाल स्टेशनरीसमोरील सार्वजनिक ठिकाणाहून काळ्या रंगाची बजाज प्लॅटिना मोटारसायकल (क्रमांक एमएच १९ ईएम २३३०) चोरीला गेली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबी आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून गोकुळ पाटील याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान त्याने बळीराम पेठेतील दुचाकी चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपासात त्याने जळगाव शहरातून आणखी ८ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ९ मोटारसायकली हस्तगत केल्या.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि शहर पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली.
पथकात पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे यांच्यासह अतुल वंजारी, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, प्रदीप सपकाळे, विजय पाटील, अक्रम शेख, किशोर पाटील, छगन तायडे, राहुल रगडे, रवींद्र कापडणे, रिजवान शेख तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.




