खान्देशजळगांवराजकीयसामाजिक

प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे : चंद्रकांत पाटील

प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे : चंद्रकांत पाटील

जळगावातील उच्च शिक्षण विभागाच्या अत्याधुनिक सहसंचालक कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन; ९८ ते ९९ टक्के कामकाज ऑनलाइन

जळगाव, प्रतिनिधी : राज्यातील महाविद्यालयांचे शासकीय कामकाज अधिक गतिमान, सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र विभागीय सहसंचालक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शासनाशी संबंधित ९८ ते ९९ टक्के कामकाज ऑनलाइन पद्धतीने होत आहे. राज्यातील सुमारे सहा हजार महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जळगाव येथे विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण कार्यालयाच्या अत्याधुनिक नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. पराग मसराम, कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील आणि उपविभागीय अभियंता एस. एल. देवरे उपस्थित होते.

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयाची ही पहिलीच अत्याधुनिक आणि प्रशस्त इमारत असल्याचे सांगून मंत्री पाटील म्हणाले की, ऑनलाइन प्रणालीमुळे महाविद्यालयांमधील वैद्यकीय देयके, निवृत्तीवेतन प्रस्ताव तसेच प्राध्यापकांचे वेतन सुरू करण्यासारखी कामे सुलभ झाली आहेत. मात्र, महाविद्यालयांचे शासनाशी संबंधित विविध प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सहसंचालक कार्यालय असणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा शासनाचा विचार आहे.

महाविद्यालयांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था सुरू करावी. तसेच विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, वॉटर फिल्टर आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शहरी आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयांनी परस्पर समन्वयातून विद्यार्थ्यांना मदतीचे जाळे निर्माण करावे. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना कुटुंबातील सदस्य समजून अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजनाचे आवाहन

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी शुद्धीकरण आणि सांडपाण्याच्या पुनर्वापराचे उपक्रम राबविण्याची गरज मंत्री पाटील यांनी व्यक्त केली. जानेवारीनंतर दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसह संबंधित घटकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. यासाठी महाविद्यालयांना शासनाकडून सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन

विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आणि त्यांच्यातील एकलकोंडेपणा दूर करण्यासाठी पुणे येथे प्राध्यापकांसाठी मोफत समुपदेशन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. मुलींच्या मोफत शिक्षणाच्या धर्तीवर एकल विद्यार्थ्यांसाठीही विशेष योजना राबविण्याचा शासनस्तरावर विचार सुरू असून, त्यासाठी आवश्यक माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महाविद्यालयांच्या खात्यांमध्ये विविध शिष्यवृत्ती आणि शुल्क प्रतिपूर्तीचा वर्षानुवर्षांपासूनचा निधी पडून आहे. या निधीचा वापर करता येत नसल्याने नियमानुसार परवानगी घेऊन तो निधी महाविद्यालयांमधील वसतिगृहे, स्वच्छतागृहे आणि अन्य मूलभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी वापरण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, मानसिक स्वास्थ्य आणि महाविद्यालयांमधील मूलभूत सुविधांना प्राधान्य देत उच्च शिक्षण विभागाची प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री पाटील यांनी विविध महाविद्यालयांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्याची ग्वाही दिली. तसेच सहसंचालक कार्यालयाच्या नूतन इमारतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button