
मेहरूण परिसरात वाळलेल्या गवत आणि चाऱ्याला भीषण आग
अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

जळगाव, प्रतिनिधी : शहरातील मेहरूण परिसरातील जावई गल्ली येथे एका चिक्की कंपनीजवळ असलेल्या वाळलेल्या गवत व चाऱ्याला मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि जळगाव महापालिकेच्या अग्निशमन दलाने तत्परतेने धाव घेत आग आटोक्यात आणल्याने परिसरातील मोठी जीवित व वित्तहानी टळली.
मेहरूण येथील जावई गल्ली परिसरात चिक्की कंपनीच्या लगत मोठ्या प्रमाणात गवत व चारा साठवलेला होता. आज दुपारी या गवताला अचानक आग लागली. वाळलेले गवत असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले आणि परिसरात धुराचे लोट पसरले. आजूबाजूला चिक्की कंपनी तसेच लोकवस्ती असल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिक प्रतीक सानप यांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन दलाला फोनवरून आगीची माहिती दिली. खबर मिळताच अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी रवाना झाला.
अग्निशमन जवानांची शर्थीची कामगिरी
अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचताच पाण्याचा मारा सुरू करत आग आजूबाजूच्या परिसरात व चिक्की कंपनीकडे पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आणली. या मदतकार्यात वाहनचालक देविदास सुरवाडे यांच्यासह फायरमन रोहिदास चौधरी, ऋषभ सुरवाडे, नवल शंकरपाळ, दीपक रोहदडे आणि ललित पाटील यांनी मोलाची भूमिका बजावत अथक परिश्रमाने आग पूर्णपणे विझवली. अग्निशमन दलाच्या या समयसूचकतेचे आणि तत्पर कामगिरीचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.




