जळगाव : – चार गंभीर गुन्ह्यात हद्दपार असतानाही लोखंडी सुरा घेऊन फिरणाऱ्या आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे (२३, रा. रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सुरा जप्त करण्यात आला आहे.
शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या आशुतोष मोरे याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तो रामेश्वर कॉलनी परिसरात सुरा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, ललित नारखेडे, साई मुंढे यांनी ८ रोजी रात्री मेहरुण तलाव जवळील बांधाजवळून आशुतोषला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक लोखंडी सुरा सापडला. पोलिसांनी तो जप्त केला असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.