फातिमा नगरात एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई!
जळगाव प्रतिनिधी,:-इच्छा देवी चौकात अवैध गॅस भरणा केंद्र मध्ये झालेल्या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात येऊन त्यांच्या जागी नव्याने आलेले पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एमआयडीसी परिसरात असणाऱ्या फातेमा नगरात घरात अवैधरित्या सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर धाड टाकून एकाला अटक करीत घरातून 34 घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर जप्त करण्याची कारवाई केली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फातिमानगर मध्ये भर वस्तीत एका घरामध्ये अवैधरित्या गॅसचा काळाबाजार करण्यात येऊन वाहनांमध्ये गॅस भरून देण्याचा गोरख धंदा सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यावरून शोएब शेख शफी वय 20 रा. फातिमा नगर याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 14 व्यावसायिक सिलेंडर आणि 20 घरगुती सिलेंडर असे एकूण 34 सिलेंडर आणि साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी ,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागुल ,हवालदार दत्तात्रय बडगुजर ,किशोर पाटील, नितीन ठाकूर, रतन गीते यांनी केली. घटनास्थळाचा पंचनामा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.