आषाढी एकादशीच्या दिवशी इस्लामपुरा भागात५० किलो गो मांस जप्त ; शनिपेठ पोलिसांची कारवाई

आषाढी एकादशीच्या दिवशी इस्लामपुरा भागात५० किलो गो मांस जप्त ; शनिपेठ पोलिसांची कारवाई
जळगाव, दि. ६ जुलै २०२५ : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिपेठ पोलिसांनी इस्लामपुरा भागात कारवाई करून सुमारे ५० किलो गो मांस व इतर साहित्य जप्त केले आहे. या कारवाईत एका संशयित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
शनिपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपुरा भागातील एका दुमजली घरात मांस विक्री होत असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र सपकाळे यांनी पोलिसांना दिली होती.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक साजिद मन्सुरी व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत इस्लामपुरा परिसरातील मदिना मस्जिदजवळ असलेल्या दुमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान सादिक साबीर शेख (वय २८) याच्याकडून ५० किलो मांस, सुरा व वजनकाटा असा एकूण १० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी शशिकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून संबंधित व्यक्तीविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.