नवी मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत महायुतीत फूट? : राष्ट्रवादी गट बाहेर पडणार?

नवी मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत महायुतीत फूट? : राष्ट्रवादी गट बाहेर पडणार?
अजित पवार गट नाराज, स्वतंत्र वाटचालीचे संकेत
नवी मुंबई वृत्तसंस्था l महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. महायुती आणि महाआघाडीमध्ये रणनीती आखण्याची लगबग सुरू झाली असतानाच महायुतीतील असंतोषाचे सूर पुन्हा एकदा सतहावर आले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या महत्त्वाच्या बैठकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे नेते सहभागी झाले होते. मात्र, या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांना निमंत्रण न मिळाल्याने त्यांच्या नाराजीला उधाण आले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीसाठी सक्रियपणे काम करणाऱ्या अजित पवार गटाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याची तीव्र भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. बैठकीसाठी आमदार, खासदार आणि मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कुणीही प्रतिसाद दिला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने नवी मुंबईत स्वतंत्र बैठक घेतली असून, यात पुढील राजकीय दिशा ठरविण्यासाठी चर्चा झाली. यावेळी महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत देत नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ निर्माण केली आहे.
जर अजित पवार गट खरोखरच महायुतीतून बाहेर पडला, तर नवी मुंबईच्या निवडणूक समीकरणांमध्ये मोठा भूकंप होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी काळात महायुतीमधील संबंध कसे जुळतात किंवा तुटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.