कडगाव शिवारात वाघुर नदीपात्रात अवैधरित्या मुरूम उत्खनन ; एक जेसीबी आणि सहा डंपर जप्त

कडगाव शिवारात वाघुर नदीपात्रात अवैधरित्या मुरूम उत्खनन ; एक जेसीबी आणि सहा डंपर जप्त
भुसावळच्या तहसीलदारांची धडक कारवाई
भुसावळ प्रतिनिधी l कडगाव शिवारातील वाघूर नदीच्या काठावर सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर तहसीलदार नीता लबडे यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलिस प्रशासनाने सोमवारी धडक कारवाई केली. या कारवाईत सहा डंपर व एक जेसीबी मशीन अशा एकूण सात वाहनांची जप्ती करण्यात आली.
तहसीलदार लबडे यांना नदीपात्रात बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी महसूल व पोलिसांचा ताफा घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पथकाच्या आगमनाने गडबड उडालेली दिसून आली. काही तस्करांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकाऱ्यांनी पाठलाग करून त्यांना रोखण्यात यश मिळवले.
कारवाईदरम्यान अवैधरित्या मुरूम भरलेली वाहने जागेवरच आढळून आली. त्यानंतर ती नशिराबाद पोलिसांच्या बंदोबस्तात भुसावळ तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.
अवैध खनिज उत्खनन रोखण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही आक्रमक भूमिका तालुक्यात चर्चेचा विषय बनली असून यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशस्वी मोहिमेत तहसीलदार नीता लबडे यांना मंडळाधिकारी रजनी तायडे, प्रफुल्ल कांबळे, प्रवीण पाटील, तसेच तलाठी नितीन तेली, गोपाळ भगत, मंगेश पारिसे, रोशन कापसे, तेजस पाटील, जितेश चौधरी व संदीप पाटील यांची सक्रिय साथ लाभली.