सोन्याने गाठला एक लाखांचा टप्पा ; एका दिवसात तब्बल १,७०० रुपयांची वाढ

सोन्याने गाठला एक लाखांचा टप्पा ; एका दिवसात तब्बल १,७०० रुपयांची वाढ
चांदीतही १,००० ची उसळी; बाजारात टॅरिफची चिंता वाढली
जळगाव (प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि अमेरिकेतील संभाव्य टॅरिफ धोरणांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली. एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ₹१,७०० रुपयांची उसळी नोंदवण्यात आली असून १० ग्रॅम सोन्याचा दर पुन्हा एकदा १,००,२०० रुपयांवर पोहोचला आहे.
चांदीही मागे नाही. सोमवारी तिच्या दरात १,००० रुपयांची वाढ झाली असून किलोचा दर आता १,१३,००० रुपयांवर गेला आहे.
गेल्या महिन्यात २३ जुलै रोजी सोन्याने १,१०० रुपयांची उसळी घेत एक लाखाच्या पुढे म्हणजे १,००,८०० रुपयांवर मजल मारली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे २४ जुलै रोजी त्यात १,७०० रुपयांची घसरण झाली आणि दर पुन्हा ९९,१०० रुपयांवर आला होता.
मंदीचा काळ, पण टॅरिफचं सावट
सामान्यतः ऑगस्ट महिना हा सराफा बाजारात मंदीचा काल मानला जातो. अनेक वर्षांची पद्धत पाहता, या काळात दर स्थिर किंवा थोडे घसरतात. मात्र, यंदा अमेरिकेतील व्यापारधोरणांतील अनिश्चिततेमुळे जागतिक गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे मागणी वाढल्याने दरात झपाट्याने वाढ झाली आहे, अशी माहिती सराफा बाजारातील जाणकारांनी दिली.





