
जळगाव पोलीस दलाला नवे नेतृत्व : श्रीकांत धिवरे यांनी स्वीकारला पोलीस अधीक्षक पदाचा पदभार
डॉ. महेश्वर रेड्डी यांना निरोप; नव्या एसपींकडून कार्यपद्धतीचा आढावा
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलीस दलात आज पदभार हस्तांतरण सोहळा उत्साहात पार पडला. मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे अधिकृतपणे जिल्ह्याची धुरा सुपूर्द केली. या वेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्यात डॉ. महेश्वर रेड्डी यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न, गुन्हेगारीवर निर्माण केलेला वचक तसेच विविध जनहितार्थ उपक्रम यांचा विशेष उल्लेख करत सहकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने केलेल्या कामगिरीचे कौतुक यावेळी करण्यात आले.
दरम्यान, नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे परंपरेनुसार स्वागत करण्यात आले. त्यांच्या अनुभवाचा जळगाव जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान होऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यावर भर दिला जाईल, असे संकेतही यावेळी देण्यात आले.
पदभार स्वीकारल्यानंतर श्रीकांत धिवरे यांनी विविध शाखांना भेट देत कामकाजाचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.




