
एलपीजी दरवाढीविरोधात बेमुदत रिक्षा बंद आंदोलनाचा इशारा
जिल्हाधिकाऱ्यांना ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनांचे निवेदन
जळगाव : एलपीजी गॅस दरवाढ व अपुरा पुरवठा यामुळे अडचणीत सापडलेल्या ऑटोरिक्षा चालकांनी प्रशासनाला तीव्र इशारा दिला असून, दरवाढ तात्काळ रद्द न केल्यास बेमुदत रिक्षा बंद आंदोलन छेडण्यात येईल, अशी भूमिका ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनांच्या संयुक्त कृती समितीने घेतली आहे.
इंधन टंचाईचा फटका
संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना लेखी निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील हजारो रिक्षा एलपीजीवर चालत असून, अपुऱ्या पुरवठ्यामुळे अनेक चालकांना रिक्षा बंद ठेवावी लागत असल्याने त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
चढ्या दराने विक्रीचा आरोप; चालकांचे आर्थिक हाल
काही गॅस पंपांवर अधिकृत दर नसताना एलपीजी गॅस सुमारे ५६ रुपयांवरून १२५ रुपयांपर्यंत विकला जात असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे चालकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होऊन अनेकांवर आर्थिक संकट कोसळल्याचे सांगण्यात आले.
एलपीजीचा नियमित पुरवठा, दर नियंत्रणात ठेवणे व चालकांना आवश्यक प्रमाणात गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा बेमुदत रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे व जिल्हाध्यक्ष राजू भाई मोरे यांनी दिला.
यावेळी मार्गदर्शक बाबुराव वाघ, चंद्रशेखर अहिरराव, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद वाणी, छोटू निकम, शांताराम अहिरे, नितीन सोनार, सुनील वाणी, विजय अहिरराव, पद्माकर पाटील, सुनील चौधरी यांच्यासह विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.





