
एटीएम फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश
आंतरजिल्हा टोळीतील एकाला अटक, दुसरा फरार ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांचे लक्ष विचलित करून त्यांच्या खात्यातून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून एक आरोपी अटकेत घेतला आहे, तर त्याचा साथीदार अद्याप फरार आहे.
दिनांक २६ मार्च २०२६ रोजी जळगाव शहरातील बेंडाळे चौक परिसरातील एसबीआयच्या एटीएममध्ये तक्रारदार पैसे काढण्यासाठी गेले असता, एका अनोळखी इसमाने त्यांचे लक्ष विचलित करून त्यांचे एटीएम कार्ड बदलले. त्यानंतर आरोपीने धुळे, नंदुरबार आणि मालेगाव येथील विविध एटीएममधून एकूण २ लाख ३१ हजार रुपये काढून फसवणूक केली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०५/२०२६ अन्वये BNS कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचा तपास वेगाने करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विविध पथके तयार करून तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी करत, तसेच गुप्त माहितीच्या आधारे धुळे येथे सापळा रचण्यात आला.
या कारवाईदरम्यान एटीएममध्ये येणाऱ्या नागरिकांचे लक्ष विचलित करून हातचलाखीने त्यांचे कार्ड बदलणाऱ्या टोळीतील शेख हबीब शेख नवाब (वय ५४, रा. लाला सरदार नगर, धुळे) याला अटक करण्यात आली. त्याचा साथीदार सैम्यक कमालुद्दीन खान (वय ३५, रा. साकीनाका, अंधेरी, मुंबई) हा फरार असून त्याच्यावर मुंबई व नवी मुंबई परिसरात दहा पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण मांडोळे, संदीप पाटील, हरिलाल पाटील, राहुल बैसाणे तसेच पोलीस कर्मचारी राहुल कोळी व विलास गायकवाड यांनी या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी बजावली.




