टॉवर चौकातील लॉजवर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एलसीबी-एएचटीयूची संयुक्त धडक कारवाई

टॉवर चौकातील लॉजवर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एलसीबी-एएचटीयूची संयुक्त धडक कारवाई
‘डमी’ ग्राहकाच्या मदतीने रचला सापळा; व्यवस्थापकासह दलाल ताब्यात, पीडित महिलांची सुटका
जळगाव : शहराच्या मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या टॉवर चौक परिसरातील एका नामांकित लॉजवर सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला. या धाडसी कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, टॉवर चौक परिसरातील एका लॉजमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बेकायदेशीररीत्या देहविक्री करून घेतली जात आहे. माहितीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार एलसीबी आणि एएचटीयूच्या पथकाने अत्यंत गोपनीय नियोजन करत प्रथम एका ‘डमी’ ग्राहकाला संबंधित लॉजवर पाठवले. तेथे सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकाराची खात्री होताच डमी ग्राहकाने पूर्वनियोजित इशारा दिला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या पथकाने लॉजवर अचानक धाड टाकत संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी लॉजचा व्यवस्थापक आणि या व्यवसायाशी संबंधित दलालांना ताब्यात घेतले. तसेच, या रॅकेटमध्ये अडकलेल्या पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांचे समुपदेशन करून त्यांना सुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या सेक्स रॅकेटची पाळेमुळे नेमकी किती खोलवर पसरली आहेत, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धडक कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरात कुठेही अशा प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.





